शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पार्थ पवारवर मात्र कारवाई होत नाही :अंजली दमानिया

Foto
मुंबई : सामान्य नागरिकांना वेगळा कायदा आणि राजकारण्यांसाठी कायदा वेगळा झाला आहे, हीच महाराष्ट्राची आजची स्थिती आहे. शीतल तेजवानीला पुण्यातील महार वतनाच्या जमीन हडप करण्याच्या प्रकरणात झालेली अटक फक्त दिखावा असून पार्थ पवारचे नाव सुद्धा एफआयआरमध्ये नाही. सरकारी जमीन १८०० कोटींची खाऊनही त्याला अटक होत नाही, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हल्लाबोल केला. या प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील यांची चौकशी होऊन तो बहरीनला गेला असल्याने अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. दिग्विजय पाटील अजित पवार यांच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी जाणार असल्याने अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, इतके गुन्हे दाखल असताना ते त्याला बहरिनला कसे पाठवण्यात आलं? ही व्यक्ती परत आली नाहीतर चौकशी कशी होणार? असा सवाल त्यांनी केला. अधिवेशन काळामध्ये राजीनामासाठी दबाव येणार असल्याने शीतल तेजवानीवर दिखाव्यासाठी कारवाई झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
पुण्यातील जमीन प्रकरणातील कारवाई संपूर्ण फार्स
 
अंजली दमानिया म्हणाल्या की, शीतल तेजवानीला यापूर्वी रॉयल ट्रीटमेंट मिळाली होती. मात्र, त्यांना जी ट्रीटमेंट मिळाली ती बघून बरं वाटलं. निवडणुकांमधील पैसा वाटप, सगळं पाहून महाराष्ट्र गुंडगिरी वळत आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र पुन्हा घडवायचा असेल, तर लोकांना झटावं लागेल असेही अंजली दमानिया म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, पुण्यातील जमीन प्रकरणातील कारवाई संपूर्ण फार्स असून त्याची सुरुवात पाच नोव्हेंबरपासून झाली. इतका संघर्ष करूनही या प्रकरणांमध्ये काहीच होत नसल्याचे अंजली जमानिया निराशा व्यक्त केली.
 
अजित पवारांच्या मुलाला कायदा लागू होत नाही
 
त्या म्हणाल्या, अजित पवारांच्या मुलाला कायदा लागू होत नाही, राजकारणी असाल तर तुम्हाला काहीच होत नसल्याचे त्या म्हणाल्या. अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ शकतो म्हणूनच काहीतरी दाखवायचं म्हणून शीतल तेजवानीला अटक करण्यात आली. दिग्विजय पाटलांची चौकशी दोन तारखेला झाली होती आणि आता तो बहरिनला गेल्याची माहिती मिळत आहे. हा जर माणूस परत नाही आला तर इतक्या मोठ्या गोष्टी चौकशी थांबणार असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या.